ऐतिहासिक व जिवंत देखावे पाहण्यासाठी गर्दी   

पुणे : गणेशोत्सवात आकर्षक देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पेठांनी यंदाही वैविध्यपूर्ण देखाव्याची परंपरा कायम ठेवली आहे. ऐतिहासिक, पौराणिक देखाव्यांसह जिवंत देखाव्यांची संख्या लक्षणीय आहे. देखाव्यांतील विषयांत वैविध्य असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही पेठांतील देखावे पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. 
 
देखाव्यांतील भव्यता हे पुण्यातील गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. देखाव्यातील भव्यता कायम राखण्याची परंपरा पेठांतील बहुतांश मंडळाने जपली आहे. बदलत्या काळानुसार पुण्यातही सामाजिक स्तरावर अनेक बदल होत आहेत. त्या बदलाची नोंद घेत सामाजिक प्रबोधन करणारे देखावेही सार्वजनिक गणेश मंडळांनी साकारले आहेत. ऐतिहासिक घटनांवर प्रकाश टाकणारे जिवंत देखावे यंदाही गणेशभक्तांचे आकर्षण ठरले आहेत. पौराणिक हलत्या देखाव्यांना लहान मुलांची पसंती आहे. तर धार्मिक देखाव्यांनाही गणेशभक्तांची मोठी गर्दी होत आहे. देखाव्यातील भव्यता गणेशभक्तांना अचंबित करणारी आहे. संगीतावर आधारित विद्युत रोषणाईच्या देखाव्यांनाही गणेश भक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
 
पुणे शहर, उपनगर, जिल्हा, विभाग, राज्य आणि देशासह विदेशातूनही मोठ्या प्रमाणात लोक देखावे पाहण्यासाठी पुण्यात दाखल होत आहेत. त्यामुळे मध्य वस्तीतील देखावे पाहण्यासाठी दिवसेंदिवस गर्दी होत आहे. कसबा पेठेतील गणेश मंडळांनी हते व पौराणिक तसेच धार्मिक देखावे साकारण्यावर भर दिला आहे. तर सदाशिव पेठ, नारायण पेठेतील मंडळांनी भव्यतेसह जिवंत देखाव्यांवर भर दिला आहे. नवी पेठेतील मंडळांनी समाज प्रबोधनावर भर दिला आहे. तसेच भवानी पेठेतील मंडळानी पौराणिक देखाव्यांवर भर दिला आहे. शनिवार पेठेतील मंडळांनी ऐतिहासिक, पौराणिक देखाव्यांसह प्रबोधनपर देखावे साकारले आहेत. अप्पा बळवंत चौकातील डीएसके चिंतामणी कॉम्प्लेसमधील नातुवाडा मित्र मंडळाने अयोध्यातील श्रीराम मंदिरातील सूर्यतिलक हा वैज्ञानिक देखावा साकारला आहे. 
 
कसबा पेठेतील जनार्दन पवळे संघाने कैलास शिव आसन रथ हा पौराणिक देखावा सादर केला आहे. हा भव्य देखावा पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी होत आहे. विजय तरूण मंडळ ट्रस्टने शिवतांडव हा हलता देखावा साकारला आहे. हा देखावा परिसरातील आकर्षण ठरला आहे. त्वष्टा कासार समाज संस्था मंडळाने ‘प्राणी वाचवा, पर्यावरण वाचवा’ असा संदेश देणारा ‘वनतारा’ हा देखावा सादर केला आहे. प्राण्यांचे स्थलांतर, प्राणी जीवनात मानवाचा वाढलेला हस्तक्षेप, आणि कमी होत असलेले प्राणी व पक्षी याबाबत जनजागृती करणारा हा देखावा आहे. या मंडळाने अत्यंत महत्त्वाचा विषय हाताळून गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेतले आहे. थोरले बाजीराव मंडळाने बालाजी रथ हा भव्य पौराणिक देखावा सादर केला आहे. या देखाव्यातील कलाकुसर परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. 
 
सदाशिव पेठेतील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार जाधव यांनी वैकुंठ चतुर्दशी दिवशी विष्णू-लक्ष्मी व शंकर पार्वतीची हरिहर भेट हा हलता देखावा सादर केला आहे. संयुक्त प्रसाद मंडळाने वैद्यकीय साहित्यांपासून निर्मित गणेश हा आकर्षक देखावा सादर केला आहे. वैद्यकीय वापर झाल्यानंतर टाकून देण्यात आलेल्या वस्तूंपासून गणेशाची सुंदर मूर्ती साकारली आहे. नारायण पेठेतील मुंजोबा बोळ तरूण मंडळाने हिरण्यकश्यप वध हा पौराणिक देखावा साकारला आहे. हुतात्मा बाबुगेनू मंडळाचा मीनाक्षी मंदिर हा भव्य देखावा गणेशभक्तांचे आकर्षण ठरला आहे. दांडेकर पुलाशेजारील साने गुरूजी वसाहत मंडळाने तुळजाभवानी मंदिराचा भव्य देखावा सादर केला आहे. या मंडळाने भव्य देखाव्यांची परंपरा यंदाही कायम राखली आहे. नवी पेठेतील राणाप्रताप मंडळाने प्रबोधनात्मक माहितीपर देखावा सादर केला आहे. पद्मशाली सम्राट मंडळाने यंदा महादेव मंदिराचा आकर्षक देखावा केला आहे. सुंदर गणपती मंडळाने अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीचा देखावा साकारला आहे.

Related Articles